⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

खळबळजनक : पोलीस परेड ग्राउंडवर फिरत असलेल्या महिला पोलिसाची सोनसाखळी लांबवली

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून चोरट्यांनी गुरुवारी रात्री कहरच केला. पोलीस मुख्यालय आवारातील पोलीस कवायत मैदानावर पायी फिरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारीला चाकूचा धाक दाखवून तिची सोन्याची चैन लांबवल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरात आणि जिल्ह्यात लहान मोठ्या चोरी आणि जबरी चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात. पोलिसांच्या घरी चोरी झाल्याचे आपण ऐकले असेल परंतु चक्क पोलीस मुख्यालयाच्या आवारातूनच महिला पोलीस कर्मचारीला लुटल्याची घटना जिल्ह्यात पहिल्यांदा समोर आली आहे. महिला पोलीस कर्मचारी आरती मोतीलाल कुमावत वय-३२ वर्ष या पोलीस वसाहतीत वास्तव्याला आहेत. गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास त्या पोलीस मुख्यालयातील मुख्य परेड ग्राउंडवर पायी फिरत होत्या.

मैदानावर असलेल्या अंधाराचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकवली आणि पळून गेला. चोरट्याच्या झटापटीत त्या जखमी देखील झाल्या. घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.