जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । भारतामध्ये कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत आहे. मात्र अशातच महाराष्ट्रात नव्या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. स्क्रब टायफस असे या आजाराचे नाव असून जळगावच्या शेजारील जिल्ह्यात आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग हाय अलर्टवर आहे.

राज्याच्या बुलडाणा जिल्ह्यात या स्क्रब टायफसच्या आजाराने शिरकाव केलाय. या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात. आपल्या देशात या आजाराचे वर्षभरातून एक दोन रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळले. केरळमध्ये जून महिन्यात स्क्रब टायफसनं एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मात्र, आता एक दोन नव्हे तर तब्बल नऊ रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळल्याने एकच खळबळ उडालीय.

त्यात एकट्या खामगाव तालुक्यात 7 रुग्ण आढळून आलेत. आता आरोग्य प्रशासनाची यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असल्याचं दिसून आलंय. खामगाव तालुक्यातील स्क्रब टायफसच्या एका रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यामुळं गंभीर रुग्णाला अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आले आहे.
‘स्क्रब टायफस’ म्हणजे काय?
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, ‘स्क्रब टायफस’ हा आजार ओरिएंटिया त्सुत्सुगामुशी बॅक्टेरियामुळे होतो. हा रोग संक्रमित चिगर्स (लार्वा मायट्सला कापल्यामुळं हा आजार फैलतो. याला बुश टायफस म्हणूनही ओळखलं जातं. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम, कार्डिओ वस्कुलर सिस्टम, श्वासाशी संबंधित आजार आहे. गॅस्ट्रोइन्टेस्टाईन सिस्टीमला प्रभावित करते. योग्य वेळेवर यावर उपचार झाले नाही, तर घातक ठरू शकते.
या आजाराची लक्षणे?
एखाद्याला संक्रमित कीटक चावला तर त्याची लक्षणे दहा दिवसांत दिसू लागतात.
ताप आणि थंडी वाजून डोकेदुखी, शरीर आणि स्नायू दुखणे यासारख्या समस्या.
जिथे कीटक चावला असेल तिथे त्वचेचा रंग गडद होतो आणि त्वचेवर कवच पडू शकते.
त्वचेवर पुरळ देखील दिसू शकतात.
गंभीर प्रकरणांमध्ये, गोंधळ, कोमा, अवयवांचे नुकसान आणि रक्तस्त्राव होऊ शकतो.












