जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जैन हिल्सला शैक्षणिक भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दिक्षारंभ कार्यक्रमांतर्गत जैन हिल्स, शिरसोली शिवार, जळगाव येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले.

या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण शेती पद्धती आणि कृषी क्षेत्रातील संशोधनात्मक उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती मिळाली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिक्षारंभ कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. निलेश सदार यांच्या समन्वयातून या भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रा. वैभव पाटील आणि प्रा. सायली विधाते उपस्थित होते.

New Project 2 1

या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी जैन हिल्स येथे राबविण्यात येणार्‍या विविध कृषीविषयक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यामध्ये पीक प्रात्यक्षिके, ऊती संवर्धन (टिश्यू कल्चर), हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, मृदा आरोग्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि शेती यांत्रिकीकरण या विषयांचा समावेश होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीची उत्पादकता वाढविणे, पाण्याचा आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे तसेच शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.कृषी शिक्षण घेताना सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व असते.

New Project 3 1

अशा शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीतील संधी, संशोधनाचे महत्त्व आणि कृषी विस्तार उपक्रमांची व्याप्ती समजण्यास मदत होते. तसेच भविष्यातील कृषी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक ज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास हातभार लागतो.नवप्रवेशित विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची दिशा समजावून देणे, त्यांच्यामध्ये आधुनिक शेतीविषयी आवड निर्माण करणे आणि त्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा दिक्षारंभ कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या कृषीविषयक ज्ञानात भर पडून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button