⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

नशीब लिहिणारी सटवाई माता, जळगावात आहे एकमेव मंदिर

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । प्रत्येक मानवाचं नशीब लिहिणारी आदिशक्ती म्हणजेच ‘सटवाई माता’ होय. जळगाव शहरात अध्यात्मिक परंपरेत स्त्री देवतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि या अनेकात एक म्हणजे सटवाई माता. या मातेचे मंदीर खूप जुने असून हे मंदिर जळगावातील ईश्वर कॉलनीमध्ये आहे. संपूर्ण जळगाव शहरात हे एकमेव मंदिर असल्याचं मानलं जाते.

बुद्धीची देवता, संपत्तीची देवता, अश्या अनेक रूपात आदिशक्ती आहे. या व्यतिरिक्त जगदंबा, दुर्गा, संतोषी, वैष्णवदेवी अजून कितीतरी नावांनी आदिशक्तीला संबोधले जात आणि यांच्यापैकीच एक ‘सटवाई माता’. भूतलावरील प्रत्येक मानवाचे नशीब सटवाई माता ब्रह्मदेव यांच्या आदेशानुसार लिहित असते आणि त्यामुळेच प्रत्येक मानवाचे आराध्यदैवत सटवाई माता आहे.

बाळाच्या पाचवीला पूजतात ‘सटवाई माता’
कुठल्याही हिंदू परिवारात बाळाचा जन्म झाला की पाचव्या दिवशी सकाळी बाळाला अंघोळ घातल्यानंतर त्याच्या गळ्यात सटवाई मातेचं ताईत (प्रतिमा) बांधली जाते. त्या बाळाचे भाग्य सटवाई माता उत्तम लिहिते असं मानलं जात. साधारणपणे हे भाग्य गतजन्मीच्या कृत्यातून प्राप्त झालेल्या पुण्याच्या अधोरेखित होत असते असे परंपरेने म्हटले जाते व यासाठी तिथे कोरा कागद व पेन ठेवला जातो.

अशी आहे आख्यायिका आख्यायिकेनुसार… एका परिवारात अपत्य होत नसल्याने त्या परिवाराने सटवाई मातेला नवस केला की, ‘हे माते मला जर मूल झाले तर मी तुला तुझा नैवेद्य देईल व मी तुझी सेवा करीन’. त्यानंतर त्या परिवारात एका वर्षाने मूल जन्माला आले व त्यांनी मानलेला नवस देखील पूर्ण केला. तेव्हापासून सटवाई मातेला नवसाची माता सुद्धा म्हणतात.

कळण्याची भाकरी, अंबाडीची भाजी, लाल चटणीचा नैवेद्य
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू परिवारात मुला-मुलींचे लग्न ठरल्यावर सर्वात आधी सटवाई मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. विशेषतः लेवा पाटील समाजात ही प्रथा अधिक पाळली जाते. सटवाई मातेच्या नैवेद्यात कळण्याची भाकरी, अंबाडीची भाजी, लाल चटणी घरून तयार करून मंदिरात नवरदेव किंवा नवरीला आणून हा नैवेद्य दिला जात असतो. ते दोघे या मंदिरात जेवण करतात ही परंपरा मंगळवार किंवा शुक्रवार रोजी केली जात असते व नंतर लग्नाच्या विधींची सुरुवात होते. हि परंपरा गेल्या १५० वर्षापासून सुरू आहे.

सुरेश काशिनाथ चौधरी हे मंदिराच्या शेजारी राहतात. १९९८ मध्ये ते इथे राहायला आले. त्यावेळी त्यांना मातेच्या मंदीराची सेवा करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी व त्यांच्या परिवाराने दररोज सेवा करायला सुरुवात केली. त्यामुळेच ते सुखी व समाधानी आहे असं ते म्हणतात. १९९८ पासून घटस्थापनेला या मातेचा उत्सव देखील सुरू करण्यात आला. उत्सवात भजन, कीर्तन, सत्संग तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम घेतले जात असतात. ही परंपरा आतापर्यंत चालू आहे. दसऱ्यानंतर भंडारा देखील करण्यात येतो. महत्त्वाचं म्हणजे या भंडाऱ्यामध्ये नैवद्य म्हणून कळण्याची भाकरी, अंबाडीची भाजी, लाल चटणी असा नैवेद्य असतो.

जळगाव शहरातील मंदिरापर्यंत पोहचणार कसे?
सिंधी कॉलनीच्या पुढे ईश्वर कॉलनी आहे. तिथे जुना मेहरूण रोड, काळी बाभळी जवळ दत्ताचे मंदिर असून त्या समोर कासमवाडीचा आठवडे बाजार भरत असतो. तिथेच सटवाई मातेचे मंदिर आहे. नेरी नाका, अजिंठा चौफुली, बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथून सहज रिक्षाने सटवाई मातेच्या मंदिरात पोहचता येईल.