यावल तालुक्यातील महिला सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांनी केलं अपात्र घोषित; कारण काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील सरपंच कल्पना संतोष चौधरी यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे.
टाकरखेडा, ता. यावल येथील येथील ग्रामपंचायतीच्या सन २०२०-२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकमधून कल्पना चौधरी या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला राखीव जागेवरून निवडून आल्या होत्या. नंतर त्यांची सरपंचपदी निवड झाली. निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल अडीच वर्ष झाल्यानंतर देखील त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते, यावर दयाराम राजाराम चौधरी यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होऊन चौधरी यांना सदस्य तसेच सरपंच पदावरून त्यांनी अपात्र घोषित करण्यात आले.