जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. अखेर मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत मंगळवारी राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला. आणि जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं. दरम्यान मराठा आरक्षणाच्या निर्णयावर आता उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्या.

काय म्हणाले संजय राऊत?
मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक करीन. आंदोलक नेत्यांनी फडणवीस यांच्यावर जहरी भाषेत टीका केली. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे, असं म्हणत राऊतांनी फडणीसांचे तोंडभरून कौतुक केलं. तर काल दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? असा सवाल राऊतांनी केला.

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांनी मुंबईत मोठे आंदोलन झाले. काल सरकारने मागण्या मान्य केल्या, जर जरांगे व आंदोलक समाधानी आहेत तर आम्हीही समाधानी आहोत. नवी मुंबईतही त्यांनी गुलाल उधळला होता. आता मुंबईतील गुलालात व नवी मुंबईच्या गुलालात काय फरक आहे ते बघावं लागेल. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे आभार मानले, ही चांगली गोष्ट आहे. सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो, असे संजय राऊत म्हणाले.
जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते, त्या समाजाचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गुलाल उधळायला नवी मुंबईत गेले होते. काल ते कुठे दिसले नाहीत, याचं कारण काय? फडणवीस स्वत: वाटाघाटीत गुंतलेले. बाकी एकनाथ शिंदे, अजित पवार कुठे होते? ते आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाहीत? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.









