⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

धनुष्यबाण आणि नावासाठी 2000 कोटींचा सौदा; राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२३ । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. सध्या या मुद्द्यावरून ठाकरे गटातील पदाधीकारी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करत आहेत. मात्र अशातच खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून टाकणारा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत?
शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. गेल्या सहा महिन्या न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला आहे. हा न्याय नाहीये. ही डील आहे. हा सौदा आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा गंभीर आरोप केला. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी दोन हजार कोटीचा व्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे लवकरच येतील. मी खात्रीने सांगतो ही डील झाली आहे. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी 50 लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी 100 कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

हा हिशोब करण्यासाठी 100 ऑडिटर लागतील. हा न्याय नाही. हे डील आहे. हा सौदा आहे. 2000 कोटी खर्च झाले. चिन्ह आणि पक्षाचं नाव विकत घेण्यासाठी किमान दोन हजार कोटी खर्च केल्याची माहिती त्यांच्या बिल्डरांनी मला दिली आहे. ते कुठे बसलेत ते सर्वांना माहीत आहे. आतापर्यंत दोन हजार कोटी खर्च झाले आहेत. मी माझ्या मतावर ठाम आहे, असं राऊत म्हणाले.