जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याच्या गृह विभागाने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व पदस्थापनेचे आदेश जाहीर करत जळगावला नवे अपर पोलिस अधीक्षक मिळाले आहेत. नाशिक विभागातील अधिकारी संदीप रघुनाथ गावित यांची पदोन्नतीनंतर अपर पोलिस अधीक्षक (जळगाव) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गृह विभागाने ‘पूरक नियमित निवडसूची २०२४-२५ (भाग-२)’ नुसार राज्य पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (निशस्त्र) संवर्गातील अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक/पोलीस उपआयुक्त (असंवर्ग) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती दिली आहे. याच प्रक्रियेतून संदीप गावित यांची जळगाव जिल्ह्यासाठी निवड झाली आहे.

संदीप गावित यांनी यापूर्वी जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून यशस्वी सेवा बजावलेली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांची बदली भुसावळ येथे करण्यात आली होती. आता पदोन्नती मिळाल्याने ते पुन्हा एकदा जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
२०१४ च्या बॅचचा ‘योगायोग’
विशेष म्हणजे, संदीप गावित हे सन २०१४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. भुसावळ उपविभागात सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत एक आगळावेगळा योगायोग पाहायला मिळत आहे. सोमनाथ वाकचौरे आणि कृष्णांत पिंगळे यांनाही याच ठिकाणी असताना पदोन्नती मिळाली होती.
दरम्यान, गावित यांच्या नियुक्तीमुळे जळगाव पोलिस दलाला अनुभवी नेतृत्व लाभणार असून, कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







