शिंदे सरकारचा यु टर्न : संभाजीनगर, धाराशीव नामांतरावर घेतला पुन्हा निर्णय!
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । ठाकरे सरकार अल्प मतात असतानाही घटनाबाह्य आणि घाईगडबडीत अनेक निर्णय घेण्यात आले होते. त्यात औरंगाबादचे, उस्मानाबादसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शुक्रवारी शिंदे-भाजप सरकारने नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. परंतु या नामांतराच्या निर्णयावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. नामांतर निर्णयावर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची तिसरी बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी ते पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं. याबाबत कायदा करून ठराव तयार करावा लागतो. त्यानुसार औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतरण करण्यात आले आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यात आले आहे. येत्या अधिवेशनात नामांतराबाबत ठराव मांडून त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत.
बहुमताला महत्व, महाविकास आघाडीवर टोलेबाजी
शिवाय 29 जून रोजी महाविकास आघाडी सरकारने हे सर्व निर्णय घाई गडबडीत आणि बहुमत नसताना घेतले होते. त्यामुळे हे घटनाबाह्य होते. आता या निर्णयाला 165 आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे आता घेतलेले निर्णय हेच घटनेला धरुन असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी यापूर्वी असे निर्णय घेतले असल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला.