⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कापसाला १० हजाराच्या वर भाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी टाकला ‘हा’ डाव

जळगाव लाईव्ह न्यूज | २० फेब्रुवारी २०२३ | गेल्या वर्षी कापसाला १० हजाराच्यावर भाव मिळाला होता. मात्र यंदा ८ हजार रुपयाच्या जवळपास दर मिळत आहेत. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकर्‍यांचा कापूस अजूनही घरातच पडून आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकत चालला आहे. याकडे शेतकर्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव जिल्ह्यातून एक हजार पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहेत. यापैकी २०० पत्र रवाना करण्यात आली आहे.

पहूर कसबे, ता. जामनेर येथील तरुण शेतकरी तुषार बनकर यांनी कापूस भाववाढीबाबत चर्चासत्र आयोजित केले होते. यात कापसाच्या भाव वाढीवर चर्चा होवून शेतकर्‍यांची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यासाठी त्यांना एक हजार पोस्टकार्ड लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. २०० पोस्टकार्ड मुख्यमंत्री कार्यालयाकडे रवाना करण्यात आली आहेत. आणखी ८०० पत्रे लवकरच पाठविण्यात येणार आहेत.

भाववाढीच्या अपेक्षेने घरात कापूस साठवणूक केलेला आहे. पण भाव वाढत नाही. एकीकडे भावाच्या विवंचनेने आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. तर दुसरीकडे सहा महिन्यांपासून कापूस घरात असल्याने शेतकर्‍यांसह परिवाराच्या शरीराला खाज येत असून शरीरावर लाल पुरळ येत आहे यामुळे शेतकर्‍यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. यामुळे कापूस दरवाढीचा तिढा लवकर सुटण्याची आवश्यकता आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.