⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

.. आणि भाजपकडेही कुणी जाऊ नये ; असं का म्हणाले मुख्यमंत्री?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीचे पथक सकाळीच शिवसेना (Shiv Sena) नेता खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या घरी पोहोचले. मागील काही तासापासून त्यांची चौकशी सुरु आहे. यावरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना संजय राऊत यांच्यावरील ईडी (ED) चौकशीवर विचारले असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. Eknath Shinde criticizes Sanjay Raut on ED inquiry

संजय राऊत यांची चौकशी चालू आहे ना. चालू द्या. त्यांना अटक होणार की नाही मला माहीत नाही. मी काही अधिकारी नाही. ईडीची (ED) चौकशी सुरू आहे. चौकशी होऊ द्या. राऊतांनीच सांगितलंय, मी काही केलं नाही. मग कर नाही त्याला डर कशाला? चौकशी होऊ द्या. त्यातून सत्य पुढे येईलच, असं ते म्हणाले आहेत.

तसेच मी जाहीरपणे सांगतो. ईडीच्या भीतीने कोणी आमच्याकडे येत असेल तर कृपया येऊ नका. शिवसेनेकडे पण येऊ नका आणि भाजपमध्येही जाऊ नका. आम्हाला दबाव टाकून कुणाला घ्यायचं नाही. हे मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. खोतकर असो की कोणीही असो. ईडीच्या कारवाईला घाबरून, भिऊन, दडपणाखाली कुणीही असं पुण्याचं काम करू नका, असंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मराठवाड्यातील पूरपरिस्थिती, शेतीचं नुकसान, नागरिकांच्या गुरं ढोरं आणि घरांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विविध योजनांची माहिती दिली. तसेच काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या. तसेच यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करणार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. दोघांचं सरकार असलं तरी निर्णय घेण्यात आम्ही कमी पडलो नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच सरकार पूर्ण कालावधी करून पुढील निवडणुकाही जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.