⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर अनेक विधायक समाजकार्य करणारे सचिन धर्माधिकारी यांना युरोपातील आंतरराष्ट्रीय युनिर्व्हसिटीने डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. राज्यासह हि सर्व श्री सदस्यांकरिता आनंदाची व उत्साहाची बातमी आहे. महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या “श्री समर्थ दासबोधाच्या निरुपणाच्या “परमार्थाबरोबर समाजकार्याचे अलौकिक कार्याची अखंड परंपरा, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने अखंड सुरु आहे. या ज्ञानयज्ञांचा भारतातच नव्हे, तर परदेशात देखील गौरव केला जात आहे.

केवळ राज्यात आणि देशातच नव्हे तर जगभरात आज सचिन धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाने डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत सुरु केलेल्या समाजकार्याची परंपरा ही इतकी मोठी आहे की, जगातील परमार्थासोबत समाजकार्याची शिकवण देणाऱ्या संस्थामध्ये डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सर्वोच्च स्थानावर आहे. सचिन धर्माधिकारी यांच्या माध्यमातून लाखों वृक्ष लागवडीचे कार्यक्रम, लाखों रुग्णांसाठी आरोग्य शिबिरे, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पुढे जाऊन उच्च शिक्षणाकरिता आवश्यक असणारे प्रशिक्षण, पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही यासाठी अनेक धरणे- विहीरी साफ करणे, जल पुनर्भरण, संपुर्ण भारतात ग्रामस्वच्छतेकरिता रस्ते, सार्वजनिक इमारती, स्वच्छतेचे सर्वात मोठे कार्य आजवर उभे करण्यात आले आहे.

तळागाळापर्यंत जाऊन प्रत्येक कामाचे नियोजन आणि त्याची पुर्ती करणारे सचिन धर्माधिकारी यांच्या अलौकिक समाजकार्याची नोंद आता भारताबाहेरील नामांकित विद्यापिठामध्ये देखील होत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तींनी अंर्तमुख होऊन मनशुध्दीने परिवर्तन करण्याचे कार्य श्रीसमर्थ बैठकीतुन परमार्थ घडवत असतानाच, या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि याकरिता शिकवण देणारे, आदरणीय धर्माधिकारी कुंटुबियांचा वारसा व परंपरा आणि आधुनिकतेच्या काळात, आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शाश्वत सामाजिक परिवर्तन घडवणारे सचिन धर्माधिकारी यांना युरोपातील आंतरराष्ट्रीय युनिर्व्हसिटीने डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. डॉक्टरेट ही मानाची पदवी केवळ अभ्यासातुनच नव्हे, तर स्व:कर्तुत्वाने प्रत्यक्षात समाजात परिवर्तन करणाऱ्या समाजकार्याचा अभ्यास करुन, त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाच दिली जाते. येणाऱ्या काळात भारतातील अनेक उच्च पुरस्कार व नामांकित युनिर्व्हसिटीतर्फे सुध्दा सचिन धर्माधिकारी यांना त्यांच्या कार्यासाठी डॉक्टरेट दिली जाईल. 

धर्माधिकारी कुंटुबिय सातत्याने समाजपरिवर्तनाचे सर्वोत्तम व प्रसिद्धीच्या पलिकडे जाऊन उच्चाकांचे सार्वजनिक उपक्रम करीत आहेत. सचिन धर्माधिकारी यांच्या या गौरवाने साऱ्या श्री सदस्यांच्या कार्याचा उत्साह अजुनही द्विगुणीत होणार आहे.