⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

“बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार!” ; सामानातून शिंदे-फडणवीस सरकारवर प्रखर टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । शिंदे-भाजप सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असला तरी मात्र अद्यापाही खातेवाटप झालेलं नाही. यावरून आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार!” या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख लिहिण्यात आलाय.

“3 दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, ‘जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसविले आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसविले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विद्यमान सरकारवर निशाणा साधला. पुन्हा त्यांनी या सरकारचे जाहीर ‘बारसे’ही करून टाकले आहे. ‘धोका देणाऱ्यांचे राज्य’ असे नामकरण त्यांनी या सरकारचे केले आहे. ‘जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार आणि त्यालाच मंत्रिपद मिळणार,’ अशा शब्दांत बच्चू यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे ‘कडू’ सत्य पुन्हा चव्हाट्यावर आणले. अर्थात त्यात नवीन काय आहे? असा सवालच सेनेनं उपस्थितीत केेला.