Pachora : गाडीच्या डिक्कीतून २ लाखाची रक्कम लांबविली; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

ऑगस्ट 26, 2025 2:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अशातच बँकेतून काढून आलेली तब्बल २ लाख रुपयांची रक्कम मोपेड गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी लांबविल्याची घटना पाचोरा शहरातील राणी नगर येथे घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून या चोरट्यांमध्ये एक अल्पवयीन मुलासह दोन जणांचा सहभाग आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

काय आहे नेमकी घटना?

पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यानुसार शहरातील न्यु उर्दू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज पाचोरा शाळेत काॅम्प्युटर घेण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये व बांधकाम मिस्तरीला ५० हजार रुपये देण्याचे असल्याने शाळेचे मुख्याध्यापक यांनी जेडीसीसी बॅंकेच्या खात्यातून २ लाख रुपये काढले. दरम्यान काढलेली रक्कम मुख्याध्यापक यांनी शाळेचे शिक्षक शेख खलिल शेख (रा. नुराणी नगर) यांचे ताब्यात ठेवण्यासाठी दिली.

शिक्षक शेख खलिल शेख नुरा यांनी सदरची रक्कम त्यांच्या मोपेड गाडीच्या डिक्कीत ठेवुन घराकडे निघाले. घरी पोहचल्यानंतर त्यांनी गाडी घराच्या कम्पाऊंडमध्ये पार्क केली. यानंतर समोर रस्त्यावर एका लहान मुलाने फिट आल्याचा बनाव केला. सदरचा प्रकार शेख खलिल शेख नुरा यांचे लक्षात येताच त्यांनी लहान मुलाकडे धाव घेतली. यातच गाडीला चावी तशीच राहिली. हीच संधी चोरट्यानी साधली. विशेष म्हणजे एक चोरटा हा बॅंकेपासुनच पाळत ठेवून होता.

दोन इसम मोटरसायकलवरुन आले. त्यांनी शेख खलिल शेख नुरा यांना घरातुन पाणी आणण्यास सांगितले. त्यानुसार शेख घरात पाणी घेण्यासाठी गेले असता याचा फायदा उचलत डिक्कीतील दोन लाखांची रोकड काढून चोरटयांनी घटनास्थळावरुन लहान मुलासह पोबारा केला. सदरचा प्रकार शेख खलिल शेख नुरा यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला. चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now