⁠ 
शनिवार, मे 4, 2024

खळबळजनक : पालजवळ पोलिसांवर दरोडेखोरांचा गोळीबार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । रावेर-पाल आदिवासी भागात सहस्त्रलिंगनजिक सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास अज्ञातांनी पोलिसांच्या दिशेने फायर केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.गोळीबार करताच संशयित चारही पसार झाले आहे. दरम्यान, गोळीबार करणारे संशयित दरोड्याच्या उद्देशाने आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गोळीबारानंतर काढला पळ

नेहमीप्रमाणे रात्रीच्या गस्तीवर पोलीस निघालेले असतांना पोलिस कॅमेरा व्हॅन ( एमएच १९ एम ०६८१) रावेरच्या दिशेने येत होती. रावेरकडून पालकडे जाणाऱ्या दोन मोटरसायकल पथकाला दिसल्या. त्यातील एका मोटरसायकलला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता मोटार सायकलस्वार पालकडे निघुन गेले. त्यानंतर त्यांच्या मागुन येणारी मोटारसायकल सुमारे तीस फुट अंतरावर असताना मागे बसलेल्या संशयितांनी पोलिसांच्या दिशेने बंदुकीने फायर केला व मोटारसायकल चालक याने मोटर सायकल जागे वरुन जोराने यु-टर्न घेत असतांना स्लीप होवुन त्यांच्या जवळील बंदुक जमिनीवर खाली पडून तुटली व मोटर सायकलवर बसलेले संशयित पळुन गेले. त्यांचा पाठलाग पोलिसांनी केला असता घटनास्थळावरुन संशयित पसार झाले.

याबाबत श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चार जणां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिक्षक नरेंद्र पिंगळे, प्रभारी पोलिस निरीक्षक बशीर शेख, सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक यांनी भेट दिली. तपास फौजदार मनोहर जाधव करीत आहे.