⁠ 
रविवार, मे 5, 2024

कोळी समाजातर्फे महामार्गावर रास्तारोको, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले

जळगाव लाईव्ह न्यूज : १ नोव्हेंबर २०२३ : मराठा समाजापाठोपाठ जळगावात कोळी समाजही आक्रमक झाला आहे. आदिवासी टोकरे कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी कोळी समाजातर्फे गेल्या 22 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्याने आज सकाळी जळगावात बांभोरी पुलावर व आकाशवाणी चौकात कोळी समाज बांधवातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बसेस वरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. या आंदोनामुळे महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

जात वैधता प्रमाणपत्र सहजरित्या मिळावे, कोळी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे या सह विविध मागण्या साठी कोळी समाज्याच्या वतीने गेल्या 22 दिवस पासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र अद्यापही या मागण्या मान्य झाल्या नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये आणि कोळी समाज मध्ये रोष असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले जगन्नाथ बाविस्कर, संजय कांडेलकर, नितीन कांडेलकर, नितिन सपकाळे, पुंडलीक सोनवणे, पद्माकर कोळी, पुष्पाताई कोळी, सुनिताताई तायडे या अन्नत्याग आंदोलन करणाऱ्यांची प्रकृती खुप खालावलेली आहे.

यामुळे संतप्त कोळी समाज बांधवांतर्फे राष्ट्रीय महामार्गावरी बांभोरी पुलावर व आकाशवाणी चौकात रास्तारोको करण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…अशी घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान बसेस वरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आहे. या आंदोनामुळे महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

या आहेत मागण्या

फक्त “कोळी” नोंदी असल्या तरी, संबंधीत अर्जदारास त्याने दावा केलेल्या “कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर वा टोकरे कोळी” या पैकी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच सन १९५० पूर्वीचा जमातीचा कोणताही पुरावा मागू नये. रक्त नातेसंबंधातील एखाद्याकडे “जात वैधता प्रमाणपत्र” असेल तर त्या आधारे त्याच्या वडिलांकडील रक्तनात्यातील वंशावळीतील सर्वांना वैधता प्रमाणपत्र त्वरीत देण्यात यावे. आदी मागण्या कोळी समाजातर्फे करण्यात आल्या आहेत.