शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पासाठी 1400 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता

मार्च 25, 2026 10:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्याच्या शेतीसिंचन प्रकल्पासाठी महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी तब्बल रु. १४०७.२० कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे. व यातून सुमारे 9128 हेक्टर क्षेत्र सिंचन / ओलीताखाली येणार आहे.

shelgaon

तापी नदीवरील हा प्रकल्प यावल तालुक्यासाठी जीवनदायी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ११ गावांतील एकूण १२२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षभर पाणी उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. प्रकल्पाच्या खर्चामध्ये कालानुरूप वाढ झाली असून १९९७-९८ मध्ये रु. 198 कोटी रुपयांची मूळ मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २०११-१२ मध्ये रु. 699.48 कोटी रुपयांची प्रथम सुधारणा, २०१७-१८ मध्ये रु. ९६८.9७ कोटी रुपयांची द्वितीय सुधारणा करण्यात आली. आता २०२३-२४ मध्ये तृतीय सुधारणा करत प्रकल्पाची किंमत रु. १४०७.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

प्रकल्पाचा लाभ-खर्च गुणोत्तर (B/C Ratio) १.९१ असून अंतर्गत परतावा दर (IRR) १०.७२ टक्के आहे, यामुळे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम मानला जात आहे. बॅरेजची एकूण साठवण क्षमता 4.11 टीएमसी असून १८.३० x १६.७६ मीटर आकाराचे १८ दरवाजे बसविण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली १९६१.४७ हेक्टर जमीन पूर्णपणे संपादित करण्यात आली आहे. बॅरेजचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून बुडीत क्षेत्रातील ४ पुलांपैकी २ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २ पुलांची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.

सध्या बॅरेजमध्ये जास्तीत जास्त २.८९ टीएमसी (70 टक्के) पाणीसाठा करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापन आणि सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी मंत्री, गिरीश महाजन सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील सिंचनाच्या विकासकामांना गती मिळाली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याने यावल तालुक्यातील शेतकरी बांधवानी मंत्री, गिरीश महाजन यांचेसह शासनाचे आभार व्यक्त केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now