जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । मागील अनेक दिवसापासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. ऑक्टबर महिना संपायला अवघे काही दिवस राहिले तरी काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या ऐन हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पिकांचे मोठे नुकसान झाले. अशातच हवामान खात्याकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजेच आज सकाळी मान्सून (Monsoon) राज्यातून परतला आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतल्यामुळे आता पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

मात्र ओडीशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सित्रांग चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे त्याचा फटका या दोन राज्यांना बसण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागाने म्हटलं आहे. यंदा राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या ऐन हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पिकांचे मोठे नुकसान झाले.

परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला बसला. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. परतीचा पाऊस आणखी किती दिवस पडणार याची चिंता शेतकऱ्याला होती. मात्र मान्सून राज्यातून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.











