सेवानिवृत्त पेन्शन धारकांना फिरवाफिरव करू नका : डॉ. पंकज आशिया
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । सेवानिवृत्त पेन्शन धारकांना या वयात त्यांच्या हक्काचे लाभ घेण्यासाठी फिरवाफिरव करू नका त्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा . पुढच्या बैठकीपर्यंत सेवानिवृत्तांचे प्रश्न सुटलेले हवेत असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवार दि. २८ जून रोजी दिले.
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील साने गुरुजी सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पेन्शन अदालतीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, महिला बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत , मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी.टी. पाटील , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे तसेच सेवानिवृत्त धारक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागील सभेत सेवानिवृत्त पेन्शन धारकांनी मांडलेल्या विविध विषयांचा आढावा घेतला. त्याचबरोबर सेवानिवृत्तांचे निवृत्ती वेतनाचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना देखील दिल्या. यावेळी पेन्शन अदालतीला अनुपस्थित पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. या अदालतीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कर्मचारी यांना तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे असे स्पष्ट निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. महागाई भत्ता , पेन्शन, फरक, या सारखी प्रकरणे निकाली काढण्यासोबतच कोणत्याही प्रकरणात . वारंवार त्रुटी लावून फिरवाफिरव करू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत मागच्या मिटिंग मधील विषय पुढच्या मिटिंग मध्ये येता कामा नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या.