⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पांझरा नदीवरील फुटलेल्या साठवण बंधारा होणार दुरुस्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । अमळनेर-पांझरा नदीवरील बाह्मणे गावाजवळील फुटलेला साठवण बंधारा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असताना आमदार अनिल पाटील सततच्या प्रयत्नांमुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून सुमारे 3 कोटी 1 लक्ष, 58 हजार 750/-रुपये निधीतून या बंधाऱ्याची दुरुस्ती होणार आहे.

याबाबत प्रशासकीय मान्यतेचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाने 8 मार्च रोजी काढले असून यात धुळे जिल्ह्यातील योजनांच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात अमळनेर तालुक्यातील बाह्मणे गावाजवळील साठवण बंधाऱ्याचा समावेश आहे. अमळनेर तालुक्यातील बाम्हणे, कळंबु, एकलहरे, व परिसरातील 6 ते 8 गावाचा सिंचन व पाण्याचा प्रश्न या बंधाऱ्यावर अवलंबून होता. मात्र, पांझरा नदीस 2018 साली आलेल्या महापुरामुळे हा बंधारा फुटला होता. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पांझरा परिसरातील शेतकरी आमदार अनिल पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत होते. एका महिन्यापूर्वीच आमदारांनी बाम्हणे ग्रामस्थांना एक महिन्याच्या आत या बंधाऱ्यासाठी निधी मंजूर करणार असा शब्द दिला होता. अखेर आमदारांनी तो शब्द पूर्ण करून दाखविल्याने पांझरा काठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना जिवंत होऊन शेती सिंचनाचा देखील विशेष फायदा होणार आहे. यामुळे सर्वत्र आमदारांचे कौतुक होत आहे. तर आमदारांनी देखोल महाविकास आघाडी शासन व जलसंधारण मंत्र्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.