⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | वाहनधारकांना दिलासा : रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी स्व:खर्चातुन महामार्गावरील खड्डे बुजवले!

वाहनधारकांना दिलासा : रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी स्व:खर्चातुन महामार्गावरील खड्डे बुजवले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । रावेर येथील बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील रावेर-सावदा दरम्यान पडलेल्या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात नित्याचे झाले होते. या अपघातामुळे आतापर्यंत अनेकांचे बळीसुद्धा गेले होते तर वाहन धारकांना होणारा त्रास लक्षात घेता रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी स्व:खर्चातुन महामार्गावरील खड्डे बुजवल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग मध्यप्रदेश महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडतो मात्र महामार्गावरील रावेर ते सावदा दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा राज्यमार्ग नॅशनल हायवे अथॉरीटीकडे वर्ग झाल्यापासून निधी आलेला नाही त्यामुळे दुर्लक्षित होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर जागो-जागी खड्डे पडले आहेत. हायवेची संपूर्ण चाळण झाली असून जनतेचे व वाहनधारकांचे ये-जा करतांनाचे हाल लक्षात घेऊन श्रीराम फाऊंडेशन पुढे सरसावले आहेत. त्यांनी महामार्गावर पडलेले खड्डे बुजवले आहेत.

रावेर-सावदा दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडले असून महामार्गावर अनेक लहान-मोठे अपघात सुध्दा झाले आहे. गत आठवड्यात खड्डे चुकवतांना एका मोटरसायकलवर मागे बसलेल्या महिलेचा बळी गेला होता. नवीन हायवे तयार होईल किंवा निधी येईल तो पर्यंत आम्ही पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजवत असल्याचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी सांगितले.

महामार्गावरील खड्डे उद्योजक श्रीराम पाटील स्व:खर्चातुन बुजवत असतांना सोपान साहेबराव पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेमूद शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गोपाल दर्जी, दीपक नगरे, देवलाल पाटील यांनी श्रमदान करत खड्डे बुजवण्यास सहकार्य केले.

बर्‍हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रावेर ते सावदा दरम्यान खड्डे चुकवतांना मागील काही दिवसांमध्ये दोन बळी गेले आहेत तर अनेक किरकोळ अपघात नित्याचे झाले आहे. चोरवडनजीक देखील महामार्गावर खड्डे पडल्याने ते बुजवण्याची अपेक्षा आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह