दुर्मीळ, घातक त्वचारोग “पेमफिगस व्हलगॅरीस” आजाराने ग्रस्त शेतमजूर महिलेला दिलासा
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । शेतमजुरी करणाऱ्या महिलेला शरीरावर जळल्यासारखे फोड झाले, त्यातून जंतुसंसर्ग झाला आणि त्यातून तिची प्रकृती अधिक गंभीर झाली. तिच्यावर तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार झाल्यामुळे तिला शुक्रवारी ४ रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. सदर महिलेला दुर्मीळ “पेमफिगस व्हलगॅरीस” हा त्वचेचा आजार जडला होता.
धरणगाव तालुक्यातील धारशेरी येथे राहणारी शेतमजूर महिला कुसुम रामकृष्ण बगळे (वय ४०) हिला शरीरावर जळल्यासारखे फोड यायला लागले. त्यातून जंतुसंसर्ग झाल्यानंतर पू व्हायला लागला. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली.नातेवाइकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेची तपासणी करून निदान केले. त्यासाठी विविध चाचण्या करून सदर महिलेला “पेमफिगस व्हलगॅरीस” हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले. तात्काळ महिलेवर औषध उपचार सूरु करून सलाईनद्वारे अँटिबायोटिक व स्टिरॉइड्स देण्यात आले. अखेर १९ दिवसांनी सदर महिलेला बरे वाटू लागल्यानंतर रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद उपस्थित होते. तर औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, सहयोगी प्राध्यापक डॉ.विजय गायकवाड, त्वचा व गुप्तरोग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप गव्हाणे, डॉ. तुषार सोनवणे यांच्यासह कक्ष क्रमांक १३ येथील इन्चार्ज परिचारिका यशोदा जोशी यांच्यासह कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.