‘कोविड-१९’ मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मिळणार सहाय्य

डिसेंबर 7, 2021 6:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । ‘कोविड-१९’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांचे सानुग्रह साहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या पोर्टलवर संबंधितांच्या नातेवाईकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

abhijit raut

‘कोविड-१९’ या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह साहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाइन वेबपोर्टल विकसित केले असून ‘कोविड-१९’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास सानुग्रह साहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी कमीतकमी कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. त्यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉग इन करणे आवश्यक राहील. तसेच https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळण्यासाठी लॉग इन करता येईल. केंद्र सरकारकडे ज्यांच्या ‘कोविड-१९’ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी ‘कोविड-१९’ मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल, तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल, तर ‘कोविड-१९’ मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णयान्वये, जिल्हा, महानगरपालिकास्तरावर गठित तक्रार निवारण समितीकडे तक्रार निवारण अपील करता येईल. या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेवून अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. सानुग्रह साहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात दिवसांकरीता वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील. जेणकरून मृत व्यक्तीच्या योग्य वारसास साहाय्य मिळावे या करीता त्याला अपील करण्याची संधी मिळू शकेल.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह साहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now