जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२५ । केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेंतर्गत शहरासाठी पहिल्या टप्यात ३० बस उपलब्ध होणार आहेत. तीन महिन्यांत सेवा सुरू करण्याची मनपाची तयारी आहे. दरम्यान बस चालवण्यासाठी ड्रायव्हर कंपनीकडून नियुक्त होणार असले तरी १२० तिकीट कलेक्टरची (वाहक) भरती मनपाकडून केली जाणार आहे.

दरम्यान लहान आकाराच्या बसेससाठी अद्याप पुरवठादार ठरला नसल्याने बारा व नऊ मीटर लांबीच्या बस प्राप्त होणार आहेत. पीएम ई-बस सेवेसाठी बस डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनसाठी उच्चदाब विद्युत वाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. महिनाभरात डेपोचे काम ७० टक्केपर्यंत करण्याची तयारी आहे. जोपर्यंत डेपो तयार होत नाही तोपर्यंत बस पुरवठादार कंपनीसोबत करारनामा केला जाणार नाही. दरम्यान पहिल्या टप्यात बारा व नऊ मीटर लांबीच्या ३० बसेस उपलब्ध होणार आहेत. तशी तयारी सुरू झाली आहे.

मनपा मालकीच्या मालमत्तांचे गत दहा वर्षांत सर्वेक्षण झालेले नाही. या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सी नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी मनपाने निविदा प्रक्रिया राबवली असून, दोन आठवड्यात याबाबत निर्णय होईल. मनपाच्या दोन हजारांपेक्षा जास्त मालमत्ता आहेत; परंतु अनेकांची माहिती मनपा दप्तरी नाही. काही मालमत्तांवर खासगी नावे लागली आहेत.







