⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार ५० जागांसाठी भरती !

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मे २०२३ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विविध प्रलंबित प्रश्नांविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत मनुष्यबळ भरणे, चिंचोली येथील प्रकल्पासाठी रस्ता तयार करणे, रुग्णालयीन परिसरातील अतिक्रमण हलविणे आदी विषयांवर चर्चा झाली.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा शल्यचिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते. बैठकीला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथील शुश्रूषा संवर्गातील रिक्त पदे भरेपर्यन्त अतिरिक्त मनुष्यबळ पुरवणेबाबत चर्चा झाली. परिचारिकांची ३९६ पदे रिक्त आहे. तरी सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या एकुण ७२ नर्सिंग संवर्गातील कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात येऊ नये, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्पुरत्या स्वरुपात रुग्णसेवा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी कंत्राटी पध्दतीने एकुण ५० पदे भरण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली.

प्रस्तावीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मौजे चिंचोली येथे जाणे येणेकरीता हायवे रोडपासून चिंचोली येथील प्रोजेक्टवर जाणे करीता रस्ता तयार करण्यासाठी कळविण्यांत आलेले आहे. अद्याप कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबीत आहे.

प्रस्तावीत बांधकामाकरीता मौजे चिंचोली येथे विद्युत पुरवठा व सबस्टेशन निर्माण करणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. अधिक्षक अभियंता, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, जळगांव यांना मौजे चिंचोली येथे विद्युत पुरवठा व सबस्टेशनची मागणी करण्यांत आलेली आहे. त्यानुसार महावितरण विभागाकडून २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवण्याबाबत आदेश देण्यांत यावेत, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,येथील संरक्षक भिंतीलगत असलेल्या शहरी भागातून वाहन येणारे ड्रेनेज लाईन ही वारंवार भरून त्यातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी हे इतरत्र रुग्णालय परिसरात पसरत असते. वेळोवेळी महानगरपालीकेने संरक्षक भिंतीलगत असलेले ड्रेनेज बंदिस्त करावी व त्याची साफसफाई दररोज करण्याबाबत महानगरपालीकेस आदेश देण्यात यावेत. संरक्षक भिंतीलगत रुग्णालयाच्या आजुबाजूस असलेले तसेच दुकानदार व छोटे व्यापारी हे कचरा इतरत्र ठिकाणी टाकत असतात. त्यामुळे दुर्गंधी येत असते. महानगरपालीकेकडून सदरहु कचरा टाकणेसाठी एक मोठी कचराकुंडी संरक्षक भिंतीलगत ठेवण्यांत यावी. तसेच त्यातील कचरा हा दररोज उचलण्याची कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.

रुग्णालयात असलेले जुने सीटी स्कॅन व इतर निर्लेखीत साहित्य त्याचप्रमाणे जुने रेकॉर्ड हे मोहाडी येथील रुग्णालयात स्थलांतरीत करण्याबाबतही सांगण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिनस्त असलेली यंत्रसामुग्री मध्ये जुने सीटी स्कॅन तसेच इतर जुनी यंत्रसामुग्री ही जिल्हाशल्यचिकित्सक यांनी निर्लेखीत करून देणेबाबत विनंती करण्यात आली. रुग्णालय परिसरात सार्वजनिक आरोग्य विभागातील जुनी रुग्णवाहिका तसेच इतर वाहने ही निर्लेखीत करण्यांत येऊन त्याचा लिलाव झाला पाहिजे. सदर जागा जिल्हाशल्यचिकित्सक यांचे कार्यालयाकडून कार्यवाही लवकर होणेसाठी आदेश देण्यांत यावेत. जेणेकरून सदरहु जागेचा वापर रुग्णसेवेसाठी व वैद्यकीय विद्यार्थ्याच्या शैक्षणीक कार्यक्रमासाठी करता येईल, असेही सुचविण्यात आले.