जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (sharad pawar)तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी शिंदे आणि पवारांच्या या भेटीतून भविष्यात वेगळं काही निर्माण होईल, असे म्हणाले होते. परंतु अशातच शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिटकरी यांचीच री ओढणारं विधान केलं आहे.
भविष्यात कोणताही गट एकत्र येऊ शकतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. त्यामुळे गुलाबराव पाटील यांचा हा इशारा भाजपसाठी आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
गुलाबराव पाटील मीडियाशी संवाद साधत होते. अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाची भविष्यात आघाडी होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीत राजकारण असू शकत नाही. सुख दुःखात एकमेकांकडे जाणे हे राजकारणाच्या पलिकडचे विषय असतात. मात्र भविष्यात कोणतेही गट एकत्र येऊ शकतात, असं सूचक विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.