⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

उत्तर महराष्ट्रातील जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का ; डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून शिवसेनेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला धक्का देण्याचे तंत्र सुरूच असून अशातच आता नाशिकमध्ये (Nashik) शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसणार आहे. येथे माजी नगरसेवक प्रवीण तिदमेंपाठोपाठ डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटात टप्प्याटप्प्याने प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन महिन्यामध्ये शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर थेट पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरच दावा केला आहे. राज्यातील शिवसेना आपलीच असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेतील बड्या नेत्यांना आपल्याकडे वळविण्याची स्पर्धाच लावली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाला नाशिकमधूनही सुरुवातीला मोठी रसद मिळेल, असे चित्र होते.

मात्र, जिल्ह्यातील दोन आमदार, तथा मंत्रिपद असलेले भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर खासदार हेमंत गोडसेदेखील शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर शिवसेनेला खिंडार पडेल अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, नाशिकमध्ये शिंदे गटाला पक्षीय पातळीवर विस्तार करण्यास फारसा वाव मिळाला नाही.

दरम्यान, पक्षाचे माजी नगरसेवक आणि नाशिक महापालिकेतील मान्यता प्राप्त म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी मुंबईत जाऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना या गटाचे महानगरप्रमुखपद देखील देण्यात आले आहे. त्यानंतर डझनभर माजी नगरसेवक शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.

नाशिकमध्ये आगामी काळात शिवसेनेला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना मनसेच्या नगरसेवकांवर अशाच प्रकारे नेत्यांचे ‘टॅग’ लावून बदनाम करण्यात आले होते. त्यामुळे निवडणुकांच्या तोडावर मनसेला गळती लागून मोठ्या प्रमाणावर नगरसेवक बाहेर पडले होते. सध्या शिवसेनेतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे.