जळगाव लाईव्ह न्यूज । जर तुमचेही मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहे. पुढील ६ महिन्यांसाठी हे निर्बंध लादल्यामुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची गर्दी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवर बंदी घातली आहे. तसेच नवीन गुंतवणूक, देयके आणि नवीन ठेवी घेण्यावरही बंदी घातली आहे.

म्हणून निर्बंध लादले?
बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे आरबीआयने (RBI) हे निर्बंध लादले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बँक सातत्याने तोट्यात चालली होती. मार्च २०२४ मध्ये बँकेला २२.७८ कोटी रुपयांचा तोटा झाला, जो २०२३ मध्ये ३०.७५ कोटी रुपये होता. बँकेची ढासळती स्थिती पाहता ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत आणि बँकेवर आणखी आर्थिक दबाव येऊ नये यासाठी आरबीआयला हे पाऊल उचलावे लागले.
१३ फेब्रुवारी २०२५ पासून सहा महिने हे निर्बध असणार आहेत. १३ फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेच्या लेखी मंजुरीशिवाय बँकेत कोणतीही आगाऊ रक्कम मंजुर किंवा वाढवणार नाही. कोणतीही गुंतवणून, निधी उधार घेणे आणि नवीन ठेवी स्विकारणार नाही. तसेच कोणतही पेमेंट करणार नाही. किंवा कोणालाही पेमेंट करण्यास सहमती देणार नाही. याशिवाय कोणत्याही मालमत्तेची विक्री आणि विल्हेवाट लावणार नाही.
बँकेने त्यांची बचत किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदरांच्या इतर कोणत्याही खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देऊ नये, असंही आरबीआयने सांगितले आहे. परंतु अटी पालून ठेवींवर कर्ज फेडण्याची परवानगी देण्यात आली आहे.