जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातर्फे आयोजित चौथ्या संगीत सभेचे आयोजन ३१ रोजी संगीत विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. विवेकानंद प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी चि. प्रसन्ना भुरे यांनी तबला वादनातील विविध प्रकार सादर करत उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

अभिजात भारतीय संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच संगीत कलेच्या अभ्यासक विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने संगीत विद्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक महिन्यात मासिक संगीत सभेचे आयोजन केले जाते. या मालिकेत तबला वादनाची सभा संपन्न झाली. प्रारंभी प्रतिष्ठानचे सहसचिव विनोद पाटील आणि मुख्य कलाकार प्रसन्ना भुरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी विनोद पाटील यांचे हस्ते प्रसन्न भुरे यांचा सत्कार करण्यात आला. ताल त्रितालाने आपल्या वादनाची सुरुवात करत त्यात पेशकार, चलन रेला, तुकडे, पलटे, त्रिपल्ली, चौपल्ली, फर्माईशी चक्रधार, लग्गी असे एकाहून एक सरस प्रकार सादर करून रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी अथर्व मुंडले यांनी गायलेल्या ‘स्वर आले दुरुनी’ या भावगीताला अतिशय नजाकतीने तबल्याची साथ करत शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकारच्या वादनाचा प्रत्यय श्रोत्यांना दिला.

प्रतिष्ठानचे संगीत शिक्षक भूषण खैरनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संवादिनीची साथ-संगत केली. तर संगीत शिक्षिका स्वाती देशमुख यांनी आभार व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत शिक्षिका श्रीमती रंजना बाभूळके यांनी केले. कार्यक्रमात डॉ.अविनाश आचार्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक गणेश पाटील, संगीत विभाग प्रमुख श्री.किरण सोहळे यांच्यासह संगीत क्षेत्रातील जाणकार रसिक श्रोते आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विनोद पाटील, स्वप्नील बेडीस्कर यांचे सहकार्य लाभले. Covid -19 च्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






