जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२६ । उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. वाराणसी-पुणे आणि अयोध्या-मुंबई या दोन नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केले.

पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ एप्रिल २०२६ रोजी वाराणसी-पुणे (हडपसर) आणि अयोध्या कॅन्ट-मुंबई (LTT) या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर, आज २९ एप्रिल रोजी दुपारी या गाड्या भुसावळ स्थानकावर पोहोचल्या. यावेळी स्थानकावर एका विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव जिल्ह्यासाठी मोठी भेट – रक्षा खडसे
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, “या नवीन रेल्वे सेवा जळगाव जिल्हा आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारची मोठी भेट आहे. वाराणसी आणि अयोध्या यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळांशी आता आपला भाग थेट जोडला गेला आहे. यामुळे हजारो भाविकांचा प्रवास सुखाचा आणि सोयीचा होईल.”












