जळगाव जिल्ह्यासाठी गुड न्यूज! दोन दिवसांच्या पावसाने गिरणा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ

जुलै 23, 2026 6:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हावासीयांसाठी दिलासादायक एक बातमी आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे गिरणा धरणातील पाण्याची आवक जवळपास थांबल्यामुळे धरणातील जलसाठा ४० टक्क्यांच्या आसपास स्थिरावला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

girna dam

जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे गिरणा आणि हतनूर धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पाणलोट क्षेत्रात जवळपास दोन आठवडे पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाणी वाढण्याची प्रक्रिया थांबली होती. यामुळे आगामी सिंचन आणि पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

मात्र, पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केल्यानंतर परिस्थिती बदलू लागली आहे. आज गुरुवारी दुपारपर्यंत गिरणा धरणातील जलसाठा ४०.३८ टक्क्यांवरून ४४.७० टक्क्यांपर्यंत पोहोचला. चणकापूर, हरणबारी, केळझर आणि पुनद धरणांमधून तसेच ठेंगोडा बंधाऱ्यातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गिरणा धरणात सातत्याने पाण्याची भर पडत आहे. येत्या काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात आणखी चांगला पाऊस झाल्यास गिरणा धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याबरोबरच शेतीसाठीही पुरेशा पाण्याची उपलब्धता राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

१५० हून अधिक गावांच्या पाणीपुरवठ्याला दिलासा

गिरणा धरण नाशिक जिल्ह्यात असले तरी त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्याला होतो. चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा आणि जळगाव तालुक्यातील १५० हून अधिक गावे तसेच चार नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत हेच धरण आहे. त्यामुळे जलसाठ्यात झालेली वाढ जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now