उद्यापासून राज्यातील या जिल्ह्यात पाऊस ; जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव लाईव्ह न्युज | ३ मार्च २०२३ | यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तापमानाचा पारा वाढताना दिसून आला आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. बदलत्या वातावणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.त्यातच आता शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. ती म्हणजे उद्या शनिवारपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज?

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या स्वरुपातील पाऊस पडू शकतो. तर मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. याचा प्रभाव विदर्भात मात्र वाढू शकतो.

विदर्भात पिवळ्या रंगातील इशारा

अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथेही मेघगर्जनेसह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारसाठी विदर्भात पिवळ्या रंगातील इशारा म्हणजे वातावरणाकडे लक्ष ठेवून राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जळगावातील स्थिती?

पूर्वेकडील वारे आणि ढगांच्या द्रोणीय प्रणालीमुळे किमान तापमानात वाढ नोंदवली गेली.

गेल्या २४ तासात जळगावमध्ये तापमानाचा पारा वाढताना दिसून आला. जळगाव येथे 24 तासांमध्ये किमान तापमान 2.3 अंशांनी वाढले. सकाळच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाण जळगाव येथे 80 टक्के नोंदवले गेले.

सकाळी अकरा नंतर उन्हाचा चटका बसू लागला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवडामध्येच तापमानाचा पारा 35 अंशावर गेला होता. त्यानुसार मार्च महिन्यात तापमानात चांगलीच वाढ होणार असून जळगावकरांना उन्हाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, उद्या जळगावमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, गहू, ज्वारी, हरभरा कढणीवर आले आहे. त्यातच आता पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.