जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । राज्यात सर्वत्र पाऊस सक्रीय झाला असल्याचे म्हटलं जात असलं तरी राज्यातील काही ठिकाणी पावसाने अद्यापही जोरदार पावसाची हजेरी लावली नाहीय. शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच हवामान खात्याकडून पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढच्या ४८ तासांसाठी संपूर्ण राज्यात मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुढचे काही दिवस पावसाचे असून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात मुसळधार पाऊस होऊ शकतो. आजपासून पुढचे दोन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढच्या २४ तासांमध्ये कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं तर शेतकऱ्यांनाही पिकाची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याकडून अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. हवामान खात्याकडून अनेक पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले. मात्र पावसाने हुलकावणी दिली. पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.