महानिरीक्षकांकडून जळगाव पोलिसांची कानउघडणी

मे 22, 2025 9:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२५ । जळगाव मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारी डोकंवर काढताना दिसत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून खंडणी आणि ड्रग्ज प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हा पोलिस दलाची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी कानउघडणी केली आहे. बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत सुनावले. ‘ज्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे, त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. कोणालाही पाठीशी घालणार नाही,’ असा स्पष्ट इशारा कराळे यांनी दिला.

maharashtara police jpg webp

विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर यांच्यासह सर्व विभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते. दत्तात्रय कराळे यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यातील प्रलंबित गुन्हे आणि दैनंदिन गुन्ह्यांचा आढावा घेतला. तसेच, आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या अनुषंगानेही त्यांनी सूचना दिल्या. तसेच ड्रग्ज व खंडणी प्रकरणात त्यांनी कडक शब्दात उपस्थितांची कानउघडणी केली.

गावठी कट्ट्यांच्या कारवाईबाबत बोलताना, मध्य प्रदेश आणि जिल्हा पोलिस दलाकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याचे कराळे यांनी सांगितले. सीमेवरील जंगलात शस्त्रे तयार होत असल्याने तेथे नियमित कारवाई सुरु आहे आणि सर्वाधिक कारवाई जळगाव पोलिसांनी केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही कारवाई यापुढेही नियमित सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ड्रग्ज प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणारच
ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध आरोप झाले आहेत आणि ज्यांच्यावर पोलिस अधीक्षकांकडून कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्या चौकशीनंतर कोणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई केली जाईल, असे कराळे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, ड्रग्ज प्रकरणात देखील चौकशीनंतर संबंधित दोषींवर कारवाई होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment