बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

राज्यात २३ जुलैपासून मुसळधार पाऊस ; कुठे बरसणार, जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । पश्चिम किनारपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्टा निवळल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, आता राज्यात २३ जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

जुलैच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राला पावसाने झोडपलं. १५ ते २० दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यात मुसळधार पाऊस झाला. सर्वदूर झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीही ओढावली. गेल्या आठवड्याभरात पावसानं थोडीशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र, भारतीय हवामान खात्याकडून पुढच्या चार ते पाच दिवसात राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, राज्यातल्या बहुतांश ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊस होईल आणि मध्यम पाऊस राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. आज (ता. 22) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पूर्व मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.