⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Rain News : जुलै पाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही आभाळमाया कायम, आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै पाठोपाठ ऑगस्ट महिन्यात देखील राज्यावर आभाळमाया कायम ठेवली. गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्यात पावसाने उसंती घेतली असली तरी तुरळक भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे, मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

सध्या गुजरात ते उत्तर केरळच्या किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती आहे, तर सौराष्ट्रापासून उत्तर-पूर्व अरबी समुद्रापर्यंत येत्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या स्थितीमुळे कोकणच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहून मुसळधार पाऊस बरसणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल. मात्र, उर्वरित ठिकाणी हलका पाऊस पडेल, तर काही ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे.

आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट’ जारी?
आज पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर (घाट भाग), सातारा (घाट भाग), अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील मागील दोन तीन दिवसापासून रिपरिप पाऊस झाला. बुधवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच होती. मात्र रात्री पावसाने जोर पकडला होता. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होते. दरम्यान, जिल्ह्यात पुढचे तीन दिवसही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे