⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Rain Update : जळगावला आजपासून चिंब भिजवणार ‘आषाढ सरी’

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यात सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मात्र, जळगाव जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान आजपासून पुढील चार दिवस जळगाव जिल्ह्यातील काही भाग आषाढसरींनी चिंब भिजण्याची शक्यता आहे.

पावसाचा जून महिना संपून जुलै उजाडला. तरी देखील यंदा जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस झालेला नाहीय. ज्येष्ठ महिन्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात जेमतेम पेरण्या झाल्या होत्या. मात्र, आषाढ महिन्यात झालेल्या पावसानंतर रखडलेल्या पेरणीला गती मिळाली आहे. मागील तीन चार दिवसापासून पावसाचे ढग दाटून येत असले तरी पाऊस मात्र पडताना दिसत नाहीय. एकंदरीत पाऊस हुलकावणी देत आहे.

मात्र, आजपासून जिल्ह्यातील काही भाग ११ जुलैपर्यंत आषाढसरींनी चिंब भिजण्याची शक्यता आहे. यापैकी ७ आणि ८ जुलैला जोरदार, ९ ते १० जुलै मध्यम व ११ आणि १२ जुलैला सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार येते चार ते पाच दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

धरणांत ३२ टक्के साठा
जिल्ह्यातील माेेठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांत गेल्या वर्षी ६ जुलैला ३१.७६ टक्के पाणीसाठा हाेता. यावर्षी ६ जुलै राेजी प्रकल्पांमध्ये ३२.३७ टक्के साठा आहे. माेठ्या प्रकल्पात ३६.७७ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ३२.२ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये ९.७१ टक्के जलसाठा आहे. वाघूर प्रकल्पात सर्वाधिक ६१ टक्के, हतनूरमध्ये १८ टक्के तर गिरणेत ३३ टक्के साठा आहे.