⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

शेतकऱ्यांनो सावधान! अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस?

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२३ । सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु आहे. त्यातच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून सहा मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकसह रब्बी पिकांवर संकट ओढवले आहे.

देशाच्या वायव्य दिशेकडून बंगालच्या उपसागरात सागराहून वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हवामान खात्याने आजपासून ६ मार्चपर्यंत राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा दिला आहे.

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज
दरम्यान, हवामान विभागाकडून आजपासून ते ८ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रत्यक्षात सोमवार दिनांक 6 मार्च संध्याकाळपासून ते बुधवार दिनांक 8 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तसेच खान्देश, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तसेच विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणात देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यातच अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारीसह पीक काढणे सुरु आहे. त्यातच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानंतर शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढावलं आहे दुसरीकडे गाटपीट होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.