शुक्रवार, डिसेंबर 8, 2023

राज्यात पुढचे दोन दिवस मुसळधार ; जळगावात कशी आहे पावसाची स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यात २३ जून रोजी मान्सूनचं आगमन झालं. त्यांनतर दोनच दिवसात मान्सूनने राज्य व्यापलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र अद्यापही जळगावात मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा करत आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस महत्वाचे असणार आहेत. मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी तर त्यानंतर दोन दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता आहे. मराठवाड्यातही मंगळवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडून नंतर जोर कमी होईल. पूर्व आणि पश्चिम विदर्भात मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

जळगावात पावसाची प्रतीक्षा :
गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या मात्र, पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांना अद्यापही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा करत आहे.