जळगाव लाईव्ह न्यूज : ८ एप्रिल २०२३ : अवकाळी पावसामुळे गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातून सावरायची वेळही शेतकऱ्यांना मिळाली नाहीये. कारण पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. विदर्भ आणि खान्देशमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.
त्यामुळे कांदा पिकासह लिंबू, संत्री, केळी व इतर फळबागांना मोठा फटका बसला आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने कांदा, भुईमूग, उन्हाळी मूग, टोमॅटो, लिंबू आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
आंब्यांचा बहरही गळून गेला. हवेचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी लिंबूची झाडे उन्मळून पडली. खान्देशात जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर (ता. जामनेर) परिसरात दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही वेळ गारा देखील पडल्या.
पाऊस सुरु झाल्यानंतर वादळही आल्याने काही घरांची पत्रे उडाली. सुमारे अर्धा तास झालेल्या अवकाळीने बाजारात पाल बांधलेल्या दुकानदारांची एकच धांदल उडून अनेकांचे नुकसानही झाले. काही वेळ पावसाचा जोर अधिक असल्याने शेतांमध्ये पाणी साचले होते.