जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२५ । शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी असून मान्सून माघारी गेला असला तरी हिंदी महासागर, बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान वाढले आहे. परिणामी राज्यात आगामी ४ दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. यामध्ये आगामी तीन दिवस जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे काढून ठेवलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे

यंदा मे महिन्याच्या प्रारंभापासून पाऊस कोसळत असलेला महाराष्ट्राचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. सप्टेंबर महिन्यात देखील पावसाने कहर केल्याचं दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आले. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली होती. यातच परतीचा पाऊस मागावर असताना जळगावसह राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. यातच मागच्या काही दिवसापासून दिवसभ ऑक्टोबर हीट जाणवत असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले.

मात्र मागच्या दोन तीन दिवसापासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. आजपासून २८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याच दरम्यान अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला मका सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज?
जळगाव जिल्ह्यामधील काही ठिकाणी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. यांनतर काल शुक्रवारी रात्री जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, आजपासून ते २७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगाळ हवामान, कमाल तापमान २७ ते ३२ अंश आणि किमान २२ ते २४ अंशराहील तर आर्द्रता ६० ते ७० टक्के असून दुपारी उकाडा जाणवणार आहे.
आगामी चार दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?
२५ ऑक्टोबर – नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, वर्धा, नागपूर.
२६ ऑक्टोबर – मुंबई, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड.
२७ ऑक्टोबर -धुळे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर.
२८ ऑक्टोबर – पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड.








