जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजपासून (5 ऑक्टोबर) परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात देखील सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे दसरा मेळावा आणि रावण दहनावर पावसाचे संकट आहे.

राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे उन्हाचा उकाडा वाढलेले पाहायला मिळाले. अशातच आजपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागानं सांगितेल आहे. दरम्यान, आजही राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, आमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील आज सायकांळच्या सुमारास हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज पहाटपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे दसरा मेळावा आणि रावण दहनावर पावसाचे संकट आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अधूनमधून पावसाने हजेरी लावली आहे. मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला होता. मात्र आता पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. उद्या म्हणजेच ६ ऑक्टोबरला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.











