शनिवार, डिसेंबर 9, 2023

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! जळगावात कशी राहणार पावसाची स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । राज्यातील काही भागात पाऊस होत असला तर अद्यापही अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरीसह सर्वसामान्य पावसाची प्रतीक्षा करीत आहे. अशातच पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या ४ दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच खान्देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून ८ जुलैपर्यंत पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील ४ दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत यलो अलर्ट नागपूर वेधशाळेने जाहीर केला आहे. तसेच विदर्भात विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट देखील राहणार आहे. राज्यात काल सोमवारी बहुतेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती.

जळगावात जोरदार पावसाची प्रतीक्षा:
राज्यात ओढ दिलेला मान्सून २३ जून रोजी दाखल झाला होता. त्यानंतर दोन तीन दिवसात मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापलं होते. मात्र जुलै महिना उजाडला तरी अद्यापही जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अधूनमधून सरी कोसळत होत्या. हा पाऊस पेरणी योग्य नसताही या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. अद्यापही जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा आहे.

जळगावला येलो अलर्ट :
अशातच हवामान खात्याने आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.खान्देशात ८ जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे.