जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घेतला होता. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. दरम्यान, अशातच आता राज्यात ऐन दिवाळीत पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यताय. विशेष म्हणजे परतीच्या पावसाचा मुक्काम अजून आठवडाभर लांबला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. त्याची तीव्रता वाढतेय. अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आज (ता.22) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, परतीच्या पावसाचा प्रवास यंदा आठवडाभर लांबणीवर पडलाय. येणाऱ्या दोन दिवसांत मान्सून राज्यातून काढता पाय घेईल, असा अंदाज आहे. मात्र, या काळात दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परतीच्या पावसाने सर्वात जास्त नुकसान शेती पिकाचे झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटामुळे गेल्याने ऐन दिवाळीत शेतकरी हवालदिल झाला आहे,











