⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

परतीचा पाऊस ‘या’ तारखेपासून थांबणार ; आज जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । परतीच्या पावसाचे ढग निवळताच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढलेला दिसून आला. दरम्यान, राज्याच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढचे चार दिवस पावसाची शक्यता आहे. काही भागात तुरळक तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अदांज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसासाठी पुन्हा हवामान पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. आज (ता. 27) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास थांबलाय. उत्तर पंजाब आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेश आणि परिसरावर देखील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याची माहिती हवामान विभागाने दिलाय. दरम्यान 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.