जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । गेल्या दोन महिन्यात राज्यात पावसाने सर्वत्र चांगली हजेरी लावली आहे. जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले होते. मात्र मागील काही दिवसापासून अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने उघडीप दिल्याने उकाडा वाढला आहे. दरम्यान, अशातच हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

राज्यात येत्या 5 दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात पहिल्या आठवड्यानंतर पाउस जोर पकडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. राज्यात अनेक भागात गेल्या आठवडाभरापासून सौम्य हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. तर जळगाव जिल्ह्यात आज सायंकाळी दमदार पावसाची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त (109 टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे; मात्र त्याचवेळी सप्टेंबरमध्ये कमाल तापमान अधिक असेल असा अंदाज आहे. सप्टेंबरच्या सुरूवातीपासूनच ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवण्यास सुरू झाले आहे.
दिवसाचे तापमान म्हणून अधिक आर्द्रतेमुळे दिवसाचे वातावरण जाचक ठरण्याची शक्यता आहे. संपूर्ण खान्देश, अहमदनगर, सांगली, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे व दक्षिण नाशिक व उत्तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, नांदगाव, येवला, वैजापूर ते सिल्लोडपर्यंतच्या तालुक्यांतही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात आज दमदार पावसाची शक्यता?
जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काहीसा सुखावला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे उन्हाचा पारा वाढला आहे. कमाल तापमान ३४ तर किमान २६ इतके होते. त्यामुळे दिवसा प्रचंड उकाडा जाणवत आहे. दरम्यानं आज शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.











