⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगावात जोरदार पाऊस; पुढचे तीन दिवस जिल्ह्यात राहील अशी स्थिती

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । जुलै पाठोपाठ ऑगस्ट महिन्यात देखील पावसाने राज्यावर आभाळमाया कायम ठेवली. गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. दरम्यान राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उसंती घेतलेली आहे. मात्र अशात हवामान खात्याकडून पढचे ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज दुपारी १.३० च्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. तसेच तर जिल्ह्याला १५ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

जुलै महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं होते. त्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटची पावसाने उसंती घेतली होती. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने राज्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील मागील गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र आज शनिवारी दुपारी जळगाव शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला १५ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले आहे. तसेच काही ठिकाणी जोरदार पावसाने पिके पाण्याखाली देखील गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अशातच आता पुढच्या तीन दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांना अलर्ट देण्यात आला आहे.