भाववाढीच्या अपेक्षा भंगल्या! जळगाव जिल्ह्यातील सीसीआय केंद्रावर कापसाच्या वाहनाच्या रांगा
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखले जाणारा कापूस विक्रीसाठी बाहेर आला आहे, परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाहीये. गेल्या दोन वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या आशेने कापूस घरात साठवून ठेवला होता, मात्र आता त्यांना मिळेल तेवढा मोबदला घेऊन कापूस विक्रीसाठी काढावा लागला आहे. यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील सीसीआय केंद्रावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दिवाळीपासून कापूस विक्रीचे प्रमाण वाढले आहे, परंतु शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाहीये. जळगावच्या सीसीआय केंद्रावर सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या कापसाच्या वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. काही शेतकरी गाड्या घेऊन मुक्कामी तर काही शेतकरी सकाळीच सीसीआय केंद्रावर दाखल झाले आहेत.
सीसीआय केंद्रावर चांगला भाव
खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला कमी भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांना सीसीआय केंद्रावर जावे लागत आहे. सीसीआय केंद्रावर कापसाला ७४२१ रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे, हे शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. मात्र, अजूनही अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी काढत नसल्याने छोटे मोठे जिनिंग उद्योग संकटात सापडले आहेत.
दहा हजार रुपये भावाची अपेक्षा
गेल्या दोन वर्षांपासून कापसाचा चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. भाव वाढीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नाही आणि घरातच कापसाची साठवणूक करून ठेवली होती. यंदा देखील भाव वाढीचे चित्र नाही, यामुळे काही शेतकरी कापूस विक्रीसाठी काढत आहेत. मात्र, कापसाला दहा हजार रुपये भाव मिळण्याची शेतकऱ्याला अजूनही अपेक्षा आहे.