⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | काय सांगता… जळगावात ‘पुष्पा’चे आंदोलन, चक्क सट्ट्याचे आकडे घेणाऱ्यांनी पुकारला संप! वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

काय सांगता… जळगावात ‘पुष्पा’चे आंदोलन, चक्क सट्ट्याचे आकडे घेणाऱ्यांनी पुकारला संप! वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । भारत एक लोकशाहीप्रधान देश असल्याने देशभरात दररोज कुठे ना कुठे न्याय, हक्क, मागण्यांसाठी संप पुकारला जातो. एरव्ही संप पुकारणारे सर्वसामान्य नागरिक, संस्था, संघटनेचे पदाधिकारी, पुढारी, राजकारणी किंवा शासकीय, निमशासकीय सेवक असतात परंतु जळगाव जिल्ह्यात सध्या एक नवीनच संपकरी चर्चेत आले आहेत. यावल तालुक्यातील न्हावी गावात सट्टा (Satta Matka) बिट घेणाऱ्यांनीच संप पुकारला असून अवैध धंद्यात देखील संप पुकारला जाऊ लागल्याने आश्चर्य वाटत आहे. सट्ट्याचे आकडे घेणाऱ्यांनी संप पुकारल्याने पोलीसदादा निवांत झाले असले तरी सट्टा खेळणाऱ्यांना मात्र लांबची रपेट मारावी लागत आहे. पुष्पा चित्रपटात अवैध धंदे करणाऱ्या पुष्पाने बंड पुकारल्यानंतर कमीशन वाढले होते. सट्ट्याच्या बाबतीत देखील असेच झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण जळगावात नव्हे तर राज्यात दिसून येईल.

भारत देशात अनेक संप, आंदोलन करण्यात आले आहेत. आपल्या न्याय, हक्कांसाठी केलेल्या आंदोलनांची शासनाला देखील दखल घावी लागली आहे. कधी आंदोलकांपुढे सरकार झुकले तर कधी संस्था, कंपनी मालक झुकले. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील एका छोट्याशा न्हावी गावात सध्या दोन सट्टा पेढी मालकांविरुद्ध सट्टा बिट घेणाऱ्यांनी कमिशन वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. जळगावात सट्टा (Gambling) बाजाराचे सर्वात मोठे रॅकेट सक्रिय असून त्यावर करोडोंचे अर्थकारण सुरु असते.

अवैध धंद्यात एखाद्याने संप पुकारणे हि खूप मोठी गोष्ट आहे. पुष्पा (Pushpa) चित्रपटात अवैधरित्या लाल चंदनची तस्करी करणाऱ्या टोळीतील पुष्पा हा देखील एक सदस्य होता. कमीशन वाढवून मिळण्यासाठी पुष्पाने पुकारलेले बंड यशस्वी झाले आणि सर्वांना कमीशन वाढवून मिळाले. चंदन तस्करांच्या टोळीतील मुख्य म्होरकेच मालामाल होत होते हे लक्षात आल्यावर हा बंड पुकारला गेला होता. जेव्हा कि पोलीस, वनविभाग अधिकारी, ग्रामस्थांच्या नजरेला चकवा देत चंदन तस्करी करण्याची जोखीम मूळ कामगारांना करावी लागत होती. सट्ट्याच्या धंद्यात देखील तसेच काही आहे.
हे देखील वाचा : साहेब तुम्ही पण.. छत्रपतींच्या पुतळ्यामागे टपरी-टपरीवर पोलिसांसमोर घेतला जातो खुलेआम सट्टा!

कमीशन २० टक्के करण्यासाठी पुकारला संप
गावोगावी, गल्लोगल्ली सुरु असलेल्या सट्टा पिढीचे मालक आणि मुख्य बुकी कायम सुरक्षित असले तरी नागरिकांशी वादविवाद, पोलीस कारवाया, टोळीबहाद्दरांच्या त्रासाला सट्टा बिट घेणारेच सामोरे जात असतात. जळगाव जिल्ह्यात बुकी आणि सट्टा पिढी मालकांकडून सट्टा बिट घेणाऱ्यांना १० टक्के कमिशन दिले जाते. त्यामध्ये बऱ्याचदा पोलिसांनी कारवाई केल्यास त्यासाठी लागणारा खर्च मिळणाऱ्या कमिशनमधून करावा लागतो. पोलीस खर्च परवडणारा नसल्याने बिट चालकांनी संपाचे हत्यार उचलले आहे. न्हावी गावातील ४०-५० बिट चालकांनी २० टक्के कमिशन वाढवून दयावे यासाठी संप पुकारला आहे. जोपर्यंत कमिशन वाढवून मिळत नाही तो पर्यत गावातील एकही बिट चालक दुकान उघडणार नाही व ज्या ही बिट चालकाने दुकान उघडल्यास त्याला चोप दिला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

बुकी आणि सट्टा मालक मालामाल, पोलीसदादांची मिलीभगत
सट्टा मालक आणि बुकी बिट चालकांच्या भरोसे लाखो रुपये कमवित आहेत. जळगाव जिल्ह्यात आज शेकडो बुकी असून त्यापैकी बहुतांश बुकी जळगाव शहर आणि पाळधी परिसरात आहे. पोलिसांकडून जेव्हा केव्हा सट्टा पिढ्यांवर कारवाई केली जाते तेव्हा क्वचितच बुकी आणि सट्टा मालकावर गुन्हा दाखल होत असतो. सट्ट्याचे आकडे घेणाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आकड्यामुळे हजारो, लाखो रुपये बुकी आणि सट्टा पेढी मालक कमावत असतो. पोलिसांना कोणत्या पिढीचा मालक कोण आणि बुकी कोण आहेत हे सर्व माहिती असताना देखील कारवाई केली जात नाही. आजवर सर्व अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे आरोप नेहमीच होतात.
हे देखील वाचा : Jalgaon SP : ..जेव्हा पोलीस अधीक्षक संतापतात, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर

..तरच होईल सट्टा बंद
जिल्ह्यात सुरु असलेल्या सट्टा पेढ्या आजवर तरी कधी कायमच्या बंद झालेल्या नाही. बुकी आणि सट्टा मालक यांची मिलीभगत असल्याने सट्टा बिनदिक्कत सुरु असतो. अवैध धंद्यावर कारवाई न करण्यासाठी देखील पोलिसांचे काही टप्पे असून पहिला टप्पा स्थानिक पोलिसांचा असतो. सट्टा मालक आणि बुकी पोलिसांना पैसे देत असल्याने बिट चालकांना कमिशन वाढवून देण्यास बुकी व मालक टाळाटाळ करीत असल्याचे बुकी सांगत आहे. कदाचित प्रथमच अशा प्रकारचा संप पुकारण्यात आला असून याआधी असा संप कुठेही पुकारण्यात आलेला नसावा. स्थानिक पोलीस, एलसीबी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तरच सट्टा बंद होईल अन्यथा न्हावी येथील संपाची बातमी राष्ट्रीयस्तरावर पोहचून जळगाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात येईल यात शंका नाही.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.