जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२५ । जळगाव आणि भुसावळ मार्गे पुणे-अजनी(नागपूर) वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार असल्यानं जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ही ट्रेन कधीपासून धावेल हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. यातच पुणे-अजनी(नागपूर) वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त ठरला आहे. रविवारी (१० ऑगस्ट) रोजी दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती रेल्वे प्रसासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. Pune-Nagpur Vande Bharat Express Time Table

ही रेल्वे नागपूरमधील अजनी स्टेशनपासून सुरू होऊन पुण्यातील हडपसर स्टेशनपर्यंत असेल. पुणे स्टेशनवर अतिरिक्त गाड्यांसाठी जागा नसल्याने हडपसर स्टेशनला तात्पुरते टर्मिनस म्हणून निवडण्यात आले आहे. ही एक्स्प्रेस आठवड्यातून तीन वेळा धावेल.

प्रवासाचा वेळ किती वाचणार?
सध्या पुणे आणि जळगाव दरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी साधारणपणे ८ ते ९ तास लागतात, तर बसनेही ८ ते १० तास लागतात. यामुळे अनेक प्रवासी वेळ वाचवण्यासाठी रस्ते प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, आता ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस हेच अंतर ६ ते ७ तासांत पूर्ण करणार आहे. यामुळे नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी किंवा कुटुंबाला भेटण्यासाठी वारंवार प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
किती स्थानकांवर थांबणार?
पुण्यावरुन ही गाडी निघाल्यानंतर दौंड, अहिल्यानगर कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, अजनी या ठिकाणी थांबणार आहे.
कसे असेल वेळापत्रक?
गाडी क्र. २६१०२ अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत सकाळी ९:५० वाजता अजनी स्थानकातून सुटेल. वर्धा स्थानकात १०:४० वाजता, बडनेरा १२:०३ वाजता, अकोला दुपारी १ वाजता, भुसावळ दुपारी २:५५ वाजता, जळगाव दुपारी ३:२६ वाजता, मनमाड ५:२५ वाजता, कोपरगाव सायंकाळी ६:२० वाजता, अहमदनगर ७:३५ वाजता दौंड ८:४३ व पुणे येथे रात्री ९:५० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात क्र. २६१०१ वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पुणे स्थानकातून सुटेल. जळगावला दुपारी १२:३५ वाजता, भुसावळ येथे दुपारी १:०५ वाजता तर अजनी स्थानकावर संध्याकाळी ६:२५ वाजता पोहोचणार आहे.
सध्या केवळ चेअर कार कोच उपलब्ध
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा सध्या फक्त चेअर कार कोचसह सुरू होईल. स्लीपर कोच पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना बसूनच पूर्ण प्रवास करावा लागेल. तरीही या जलद सेवेमुळे प्रवासाचा अनुभव नक्कीच सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.








